निबंध शैक्षणिक

मकर संक्रांति मराठी माहिती, निबंध, भाषण- Makar Sankrant

makar sankrant marathi mahiti nibandh
Wikepedia

भारतामध्ये विविध प्रकारचे सण अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात. अशाच एका सणांपैकी एक म्हणजे मकर संक्रांति. मकर संक्रांति हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. याच दरम्यान शालेय विद्यार्थ्यांना मकर संक्रांति विषयावर माहिती, निबंध, १० ओळी, भाषण, इत्यादी लिहून आणण्यास सांगितले जाते. म्हणूनच आम्ही ह्या लेखामध्ये मकर संक्रांति विषयावर मराठी मध्ये माहिती दिली आहे. हि माहिती तुम्हाला शाळेतील गृहपाठ, मराठी निबंध, भाषण, इत्यादी लिहण्यास मदत करेल. चला तर मग सुरु करूया.

मकर संक्रांति मराठी मध्ये माहिती, निबंध – Essay on Makar Sankranti

मकर संक्रांति किंवा मागि हा हिंदू दिनदर्शिकेतील सूर्य देव त्याला समर्पीत सण आहे. मकर संक्रांति दरवर्षी जानेवारी महिन्यात 14 किंवा 15 तारखेला असते. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करतो आणि या दिवसापासून मोठे दिवस चालू होतात. मकर संक्रांति हा असा प्राचीन सणांपैकी एक आहे जो सौर चक्रावर अवलंबून आहे, तर हिंदू धर्मातील बहुतेक सण चंद्र विधीनुसार साजरी केली जातात. सौर चक्रानुसार साजरा करणारा हा उत्सव असल्याने दरवर्षी याची तारीख ग्रेगोरियन कॅलेंडरच्या 14 जानेवारी ला असते. पण कधीकधी एक दिवसाचा फरक पडून मकर संक्राती 15 जानेवारीला सुद्धा असते. जसे की 2020 मध्ये मकर संक्रांत 15 जानेवारीला आहे.

मकर संक्रांत अशी संबंधित उत्सव वेगवेगळ्या नावाने ओळखले जातात जसे की माघी (उत्तर भारत,पंजाब), पौष संक्रांति किंवा मकर संक्रांत (महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, कर्नाटक, तेलंगणा), माघ बिहू (आसाम), थाई पोंगल (तामिळनाडू).

मकर संक्रात कशी साजरी केली जाते?

संक्रात हा एक सामुदायिक सण आहे, या दिवशी लोक रंगीबेरंगी सजावट करतात. पहिल्या काळात संक्रांतीच्या दिवशी ग्रामीण भागात लहान मुले गाणी गात घरोघरी जात असत आणि मिठाई मागत असत. संक्रांतीच्या दिवशी गावच्या जत्रा भरत असत. तसेच या दिवशी घरोघरी मेजवानी असायची, लोक पतंग उडवत असत. वेळेनुसार या सणाचे रूप बदलत चालले आहे, आजकाल मकर संक्रांति हा सण स्त्रियांचा सण बनून राहिला आहे.

प्रत्येक बारा वर्षांनी मकर संक्रांतीच्या दिवशी कुंभमेळा भरतो. ज्यामध्ये लाखो लोक पवित्र नदी मध्ये अंघोळ करून सूर्याला नमन करून आपले पाप धुऊन टाकतात. कुंभमेळा ची प्रथा आधी शंकराचार्य यांनी सुरू केली होती.

मकर संक्रांतीचे महत्व

मकर संक्रांति हा सण सूर्य देवता ला समर्पित आहे. हिंदू धर्मामध्ये सूर्यदेवाचे खूप महत्त्व आहे, याचे वर्णन वेदांमध्ये सुद्धा केले आहे (गायत्री मंत्र). यादिवशी उत्तरायण चालू होते, हा सहा महिन्याचा काळ हिंदू धर्मामध्ये शुभ मानला जातो. मकर संक्रातीचे अध्यात्मिक महत्व सुद्धा आहे म्हणून लोक या दिवशी पवित्र नद्या जसे की गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, कावेरी यांमध्ये आंघोळ करतात. या पवित्र नद्यांमध्ये आंघोळ केल्याने पापांचा नाश होतो असे मानले जाते.

भारतामध्ये मकर संक्रातीला जरी वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तरी एक प्रथा आहे जी सर्व प्रदेशांमध्ये समान आहे. ही समान प्रथा म्हणजे तिळगुळ होय. प्रत्येक प्रदेशात या दिवशी तीळ आणि गूळ यापासून प्रसाद बनवला जातो आणि ते कुटूंबातील सदस्यांमध्ये, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना वाटले जाते. तिळगुळ हे वेगवेगळे असूनही शांततेत व आनंदात एकत्र राहण्याचे प्रतिक मानले जाते. महाराष्ट्रामध्ये तिळगुळ वाटताना ” तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला” असे बोलण्याची प्रथा आहे.

स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी हळदी-कुंकू कार्यक्रम ठेवतात, ही प्रथा विशेष करून महाराष्ट्रामध्ये आहे. हळदीकुंकू समारंभात गावातील स्त्रिया एका ठिकाणी जमा होतात, या कार्यक्रमासाठी त्या महाराष्ट्रीयन पेहरावात नटून-थटून येतात. एकमेकांना हळदी कुंकू लावून हा कार्यक्रम साजरा केला जातो. तसेच यावेळी स्त्रिया एकमेकांना भेटवस्तू सुद्धा देतात. भारताच्या खूप साऱ्या प्रांतांमध्ये मकर संक्रांतीच्या वेळी रब्बी पिकाची सुरुवात असते. या काळात शेतातील पेरणी झालेली असते आणि अवघड कामे संपलेली असतात मग या वेळी लोक एकत्र येतात, एकमेकांसोबत वेळ घालवतात, गुरांची काळजी घेतात, एकत्र पतंग उडवणे असे सामूहिक कार्यक्रम करतात.

मकरसंक्रांत हा पौष महिन्यातील एक महत्वाचा सण आहे. दरवर्षी १४ किंवा १५ जानेवारीला संक्रांत येते. फार पूर्वी संकारसूर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना खूप त्रास देत असत छळ करत असत. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकारसुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. त्या दिवशी उत्तरायणाला प्रारंभ होतो.

मकर संक्रांति हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. आपली भारतीय संस्कृती ही कृषिप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांमध्येही हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. या दिवसांमध्ये शेतात आणि मळ्यांमध्ये आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात(बोळक्यात, खणामध्ये) भरून त्या देवाला अर्पण करतात.

संक्रांतिच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात तसेच इतर काही राज्यांमध्ये भोगी हा सण साजरा केला जातो. या दिवशी सर्व शेंगाभाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट टाकून मिश्र भाजी केली जाते. त्यामध्ये पावटा, वाटाणा, वांग, बटाटा, गाजर, बोरे, पांढरे तीळ, हरभरा, वाल पापडी, घेवडा या सर्व भाज्यांचा समावेश असतो. तसेच तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी या दिवशी आवर्जून केली जाते.

संक्रांतिला तिळाचे फार महत्व आहे. हा काळ थंडीचा असतो. त्यामुळे अंगात उष्णता निर्माण होण्यासाठी तीळ खायचे तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाणे, पावटा, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा समावेश जेवणात करायचा असतो. तीळ वापरण्याचा दुसरा अर्थ त्यामधील स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह-मैत्री, या स्नेहाचे गुळासोबत मिश्रण करतात.

स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातील मुख्य हेतू आहे . म्हणूनच या मकरसंक्रांतीच्या दिवशी एकमेकांना तीळ गूळ देऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. तिळगुळ देऊन ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे एकमेकांना म्हटले जाते. या सणाच्या निमित्ताने स्नेह वाढवायचा, नवीन स्नेहसंबंध जोडायचे, जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्ववत करायचे.

संक्रांतीच्या दिवशी तिळाची वडी किंवा लाडू केले जातात आणि एकमेकांना दिले जातात. तसेच तीळ गुळाची पोळी यादिवशी आवर्जून केली जाते. संक्रांतीच्या दिवशी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये सकाळपासूनच महिला भाविकांची गर्दीच गर्दी झालेली असते. रुक्मिणी मातेच्या मंदिरात महिला एकमेकींना वाण वसा मोठ्या श्रद्धेने देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात (बोलकी, वाण) भरून देवाला अर्पण करतात. अशाप्रकारे हा संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात भारतात साजरा होतो.

मकर संक्रांती भारतीय उपखंडातील बर्‍याच भागांमध्ये काही प्रादेशिक भिन्नतेने साजरी केली जाते आणि वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते व प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या रीतीरिवाजांनी व साजरी केली जाते:

सुग्गी हब्बा, मकरा संक्रमणा, मकर संक्रांती: कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा
मकर संक्रांती किंवा मकरा मेळा आणि मकरा चौला: ओडिशा
मकर संक्रांती, माघी संक्रांत, हळदी कुंकू किंवा संक्रांती: महाराष्ट्र आणि गोवा
थाई पोंगल, उझावर थिरुनाल: तामिळनाडू
उत्तरायण: गुजरात
माघी: हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि पंजाब.
माघ बिहू किंवा भोगली बिहू: आसाम
शिशूर सेन्क्रांत: काश्मीर व्हॅली
खिचडी: उत्तर प्रदेश आणि पश्चिम बिहार
पौष संक्रांती: पश्चिम बंगाल
टीला सकराईत: मिथिला

इतर देशांमध्येही हा दिवस हिंदूंनी साजरा केला जातो, परंतु वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या प्रकारे.

नेपाळ: माघे / माघी संक्रांती, खिचडी संक्रांती
बांगलादेश: शक्राइन / पौष संक्रांती
पाकिस्तान (सिंध): तिर्मुरी
श्रीलंका: थाईपोंगल
मलेशिया: थाईपोंगल

विविध प्रदेशातील प्रथा

भारतातील विविध प्रदेशांत मकर संक्रांत विविध पद्धतीने साजरी केली जाते.

कर्नाटक

कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी हा सुगी म्हणजेच कापणीचा सण आहे. याला “एल्लू बिरोधू” असेही म्हणतात. प्लेटमध्ये “एल्लू” (पांढरे तीळ), तळलेले शेंगदाणे, कोरड्या नारळाचा किस आणि बारीक कापलेले बेला (गूळ) मिसळून मिश्रण बनवतात त्याला “एल्लू-बेला” (ಎಳ್ಳು ಬೆಲ್ಲ) म्हणतात. तसेच ताटात उसाचे तुकडे हि ठेवतात. कन्नड मध्ये एक म्हण आहे “इल्लू बेला थिंदु ओले माथाडी” याचा अनुवाद ‘तीळ आणि गूळ यांचे मिश्रण खा आणि चांगले बोला’ असा होतो. महाराष्ट्रात याला “तिळगूळ घ्या गोड गोड बोला” असे म्हटले जाते. कर्नाटकातील महिलांमध्ये इल्लू बेला, एल्लू उंडे, केळी, ऊस, लाल बेरी, हळदी आणि कुमकुम आणि दैनंदिन जीवनात उपयुक्त अशा लहान भेट वस्तूंची देवाणघेवाण होते.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणा

संक्रांती हा सण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये चार दिवस साजरा केला जातो:

  1. पहिला दिवस – भोगी (భోగి) (आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्र) : भोगीच्या दिवशी लोक जुन्या आणि विकृत गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींकडे लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन घडते.
  2. दुसरा दिवस – मकर संक्रांती (మకర సంక్రాంతి-పెద్ద పండుగ), मुख्य उत्सव दिवस
  3. तिसरा दिवस – कानुमा (కనుమ) (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा): कानुमा हा सण शेतकर्‍यांच्या हृदयाच्या अगदी जवळचा आहे कारण त्यांच्या गुरांची सन्मानाने प्रार्थना आणि प्रदर्शन करण्याचा हा दिवस आहे. गुरेढोरे हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
  4. चौथा दिवस- मुक्कनुमा (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा): चौथ्या दिवसाला मुक्कनुमा (ముక్కనుమ) म्हणतात जे समाजातील मांसाहार्यांमध्ये लोकप्रिय आहे. या दिवशी शेतकरी नैसर्गिक घटकांना (जसे की माती, पाऊस, आग) आणि (गावातल्या) देवींना भेटवस्तू देऊन प्रार्थना करतात आणि ज्यात कधीकधी प्राण्यांची आहुती दिली जाते. ग्रामीण महाराष्ट्रात याला राखण देणे असे म्हणतात.

महाराष्ट्र

महाराष्ट्रामध्ये संक्रांतीच्या दिवशी हलवा आणि पुरण पोळी बनवली जाते. एकमेकांना तीळगूळ देऊन “तिळगूळ घ्या गोड गोड बोला” असे म्हटले जाते. तीळगूळ देण्याचा मूळ विचार असा आहे कि भूतकाळातील वाईट भावना व शत्रुत्व विसरून गोड बोलण्याचा आणि मित्र राहण्याचा संकल्प करणे.

विवाहित महिला मैत्रिणी / कुटुंबातील महिलांना आमंत्रित करतात आणि हळदी-कुंकू साजरे करतात. विधीचा भाग म्हणून अतिथींना तिळगुळ आणि काही लहान भेट दिली जाते. या दिवशी स्त्रिया काळ्या साड्या नेसतात. सक्रांती हिवाळ्यात असते आणि काळ्या रंगाचा पोशाख परिधान केल्याने शरीराची उब वाढते. काळा रंग परिधान करण्यामागील हे मूळ कारण आहे, बाकी कुठल्याही सणात काळे कपडे चालत नाहीत.

मी अशी अशा करतो कि तुम्हाला हा मकर संक्रांति वरील निबंध, भाषण आवडले असेल. जर तुम्हाला हि माहिती उपयुक्त ठरली असेल तर कृपया कंमेंट सेकशन मध्ये तुमचे विचार कळवा. धन्यवाद. 🙂

About the author

Ajay Chavan

"Cut from a different cloth"
I believe words have the power to change the world. So, here I am, determined to change the world and leave my mark on it, one word at a time.
A writer, amateur poet, ardent dog lover, Sanskrit & Urdu enthusiast, and a seeker of Hiraeth.

Leave a Comment

1 Comment